कागलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक व मिरवणूक उत्साहात
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून पुतळ्याचे पूजन व दुग्धाभिषेक
कागल/प्रतिनिधी : कागलमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला दुग्धाभिषेक व जलाभिषेक घालण्यात आला. येथील बसस्थानकाजवळच्या अश्वारूढ पुतळा परिसरात शहरातील प्रमुख मान्यवरांसह कार्यकर्ते उपस्थित होते.सकाळी अकरा वाजता शहराच्या मुख्य बाजारपेठेतून सवाद्य मिरवणूक निघाली. मिरवणुकीपुढे हातात शिवज्योत घेतलेले ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, नगराध्यक्षा सौ. माणिक माळी, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर आदी प्रमुख उपस्थित होते. गैबी चौकातून निघालेली ही मिरवणूक पुढे पोलीस स्थानक, खर्डेकर चौक, कोल्हापूर वेश कमानीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यापर्यंत आली. मिरवणुकीवर ठीकठिकाणी गॅलरी आणि स्वागत कमानीवरून फुलांचा वर्षाव होत होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांच्या निनादात ही मिरवणूक निघाली.
चौकट……..
शिकवण जनतेच्या कल्याणकारी राज्याची!
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातीची जिवाभावाची माणसं जमा केली आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केले. राज्य हे जनतेच्या कल्याणासाठी चालवायचं असतं याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला आहे. त्यांनी त्या काळात काढलेले वटहुकूम, खलिते आजही राज्यकारभार चालवताना प्रमाण मानले जातात.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, रमेश माळी, उपनगराध्यक्ष बाबासो नाईक, प्रविण काळबर, नितीन दिंडे, सतीश घाडगे, सौरभ पाटील, विवेक लोटे, आनंदा पसारे, विकास पाटील, रमेश माळी सुनील माळी, नेताजी मोरे, अर्जुन नाईक, पंकज खलिफ, अमित पिष्टे, संग्राम लाड, अमोल डोईफोडे, बच्चन कांबळे, मुख्याधिकारी पंडीत पाटील, अल्का मर्दाने, शोभा लाड, माधवी मोरबाळे, पद्मजा भालबर, आदींसह पालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते .