ॲस्टर आधार हॉस्पिटल येत्या वर्षभरात करणार गरजूंसाठी मोफत सी टी स्कॅन – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे गौरवोद्गार
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरातील ॲस्टर आधार हॉस्पिटलच्यावतीने सुरू केलेला “ॲस्टर फ्री इन” हा उपक्रम गोरगरीब रुग्णांना दिलासादायक आहे, असे गौरवोद्गार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.
कोल्हापुरातील ॲस्टर आधार हॉस्पिटलच्या “ॲस्टर फ्री इन” या उपक्रमाचा लोकार्पण मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. या उपक्रमांतर्गत येत्या वर्षभरात गरजू व गरीब एक हजार रुग्णांचे सिटीस्कॅन मोफत केले जाणार आहे.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, ॲस्टर आधार ही देशातीलच नव्हे तर जगातील गुणवत्त व दर्जेदार वैद्यकीय व्यवस्था आहे. समाजातील गोरगरीब व गरजू रुग्णांचे योग्य निदान व उपचार करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. ॲस्टर डीएम हेल्थकेअरचे चेअरमन व एम.डी. डॉ. आझाद मोपेन यांच्या संकल्पनेतून सामाजिक बांधिलकीतून पुढे आलेला हा लोकोपयोगी उपक्रम आहे.ॲस्टर डी. एम. हेल्थकेयर ही अशीच एक संस्था, जी गेली ३४ वर्षे गुणवत्तापूर्वक आरोयसेवा जगभरात देण्याबरोबरच सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे.
हॉस्पिटलचे एम. डी. डॉ. उल्हास दामले म्हणाले, दुबईमध्ये मुख्यालय असणाऱ्या या संस्थेचे जगभरात ३५६ ठिकाणी हॉस्पिटल, क्लीनिक, फार्मसी आहेत, ज्या ७ वेगवेगळ्या देशांमध्ये पसरलेल्या आहेत. भारतात असणाऱ्या १४ हॉस्पिटलपैकी १ हॉस्पिटल हे आपल्या कोल्हापूरमधील ॲस्टर आधार हॉस्पिटल आहे.
या कार्यक्रमादरम्यान ॲस्टर डी एम हेल्थकेयरचे चेयरमन, डॉ. आझाद मोपेन दुबईवरून पाठवलेल्या खास व्हिडिओ संदेशात म्हणाले, “ॲस्टर फ्रीइन- मोफत इन्व्हेस्टीगेशन” हा उपक्रम लाँच करताना खूप आनंद होतो आहे. ‘ॲस्टर व्हॉलेंटियर’ हि आमची सामाजिक कार्य करणारी शाखा असून या अंतर्गत आम्ही अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतो. समाजाने आम्हाला खूप काही दिले आणि समाजाला आपण गरजेच्या वेळी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे, या भावनेतूनच ‘ॲस्टर व्हॉलेंटियर’ चालू केले आहे. २७,००० हुन जास्त व्हॉलेंटियर सध्या जगभरात विविध कार्य करतात. ३ वर्षपूर्वी केरळमध्ये आलेल्या महापुरात कोल्हापूरमधून असे व्हॉलेंटियर मदतीस धावून आले होते. “ॲस्टर फ्रीइन- मोफत इन्व्हेस्टीगेशन” उपक्रमाअंतर्गत आम्ही कोल्हापूरमध्ये येते पूर्ण वर्ष म्हणजे डिसेंबर २०२१ पर्यंत गरजू रुग्णांसाठी मोफत सी टी स्कॅन केले जातील.वेळीच केलेल्या योग्य निदानामुळे अचूक उपचार करणे शक्य होईल.”
‘ॲस्टर व्हॉलेंटियर’ अंतर्गत आत्तापर्यंत १०,००० हुन जास्त लोकांना बेसिक लाईफ सपोर्ट शिकवले गेले आहे. वृद्धाश्रम, अनाथालय, अथवा अपंग व्यक्तींना वेळोवेळी ॲस्टर व्हॉलेंटियर अंतर्गत मदत केली जाते. कोल्हापुरात काही वर्षांपूर्वी आलेल्या महापुराच्या आणीबाणीदरम्यानॲस्टर व्हॉलेंटियरनी पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकानी हलवणे, आरोग्य सेवा व औषधे मोफत देणे अशी महत्वाची कार्ये पार पाडली आहेत.
यावेळी ॲस्टर आधार हॉस्पिटलचे एम. डी. डॉ. उल्हास दामले, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद मोटे, डॉ. संजय देशपांडे, डॉ. संतोष सरुडकर, डॉ. अमित माने आदी उपस्थित होते.