राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस एकत्र हा महाआघाडीचा धर्म, राष्ट्रवादीचे पत्रक: ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला भरघोस यश
कोल्हापूर/प्रतिनिधी : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस एकत्रित राहिले हा महाविकास आघाडीचा धर्म आहे, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भाजपला लगावला आहे. दरम्यान; या निवडणुकीत कागल, गडिंग्लज उत्तूर मतदारसंघात निवडणूक लागलेल्या ६६३ जागांपैकी एकट्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ३२०, तसेच शिवसेना व मित्रपक्षांना २१० जागा मिळालेल्या आहेत.
या पत्रकावर जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य युवराजबापू पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, जिल्हा परिषद सदस्या सौ. शिल्पा शशिकांत खोत या प्रमुखाच्या सह्या आहेत.पत्रकात पुढे म्हटले आहे, कागल, गडिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघात एकूण ६६३ जागांसाठी निवडणूक लागली होती. त्यापैकी तब्बल ३२० जागा एकट्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिंकल्या आहेत. २१० जागांवर शिवसेना, काँग्रेस आणि मित्र पक्षांचे उमेदवार विजयी झालेत.
शाहू सहकारी साखर कारखान्याच्या प्रभाव पट्ट्यातील गावांमध्ये काय झालं, याबद्दल तुम्ही एक चकार शब्द सुद्धा बोलत नाही. कारखान्याच्या बुडात असलेली लिंगनूर दुमाला , करनूर, वंदूर, व्हन्नुर, सिद्धनेर्ली, एकोंडी, शेंडूर, पिंपळगाव बुद्रुक, साके या गावांमधून जनतेने तुम्हाला हद्दपार केले, हे सोयीस्कररित्या विसरू नका. दरम्यान; सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या पंचक्रोशीत काय झालं ? या प्रश्नाला उत्तर देताना या पत्रकात म्हटले आहे, एक हसूर खुर्द गाव वगळता माद्याळ, आलाबाद, बिनविरोध झालेले वडगाव, मांगनूर, बेलेवाडी मासा, तमनाकवाडा, बोळावीवाडी, करंजीवणे, लिंगनूर कापशी, गलगले, मेतके या सेनापती कापशी खोऱ्यातील गावांमध्ये राष्ट्रवादीसह महाविकास आघाडी व मित्रपक्षांची सत्ता आलेली आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पक्षांने मिळवलेले घवघवीत यश जाहीर केले. तो संदर्भ घेऊन त्यांच्याबद्दल उध्दटपणाची वक्तव्य करणे, हे निषेधार्हच आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदावरून समरजीत घाटगेना हटवा, अशी मागणी दस्तुरखुद्द भाजपमधूनच झाली होती. त्यांनी दुसऱ्या पक्षांच्या जिल्हाध्यक्षावर अशी टीका -टिप्पणी करण्याचा नैतिक अधिकार नाही.
चौकट ………
शाहू साखर कारखाना उपाध्यक्षाना निमंत्रण!पत्रकात म्हटले आहे, समरजीत घाटगे यांचे वक्तव्य म्हणजे “पडलो तरी नाक वर” अशा पद्धतीची आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जास्त जागा निवडून आलेत हे आकड्यांनीशी प्रसिद्ध होऊनही, तुम्हाला पटणारच नसेल तर ज्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विजयी उमेदवारांचा मेळावा व सरपंच निवडी होतील, त्या दिवशी त्यांची संख्या मोजण्यासाठी तुम्ही शाहू साखर कारखान्याच्या उपाध्यक्षाना पाठवून द्या, असे निमंत्रणही या पत्रकातून दिले आहे.