जिल्ह्यातील सर्वच गावात एकाचवेळी सार्वजनिक घोषणा आता कळणार,कोल्हापूर मध्ये ही योजना लवकरच सुरू होणार – पालकमंत्री सतेज पाटील
कोल्हापूर/प्रतिनिधी : आपत्तकालीन स्थिती असो की पूरस्थिती, सरकारी योजनांचे प्रसिद्धीकरण असो की लोकांमध्ये जनजागृती हे, जिल्ह्यातील सर्वच गावात एकाचवेळी सार्वजनिक घोषणा (public address system)करण्याची योजना कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत सार्वजनिक घोषणा प्रणाली योजनेची अंमलबजावणी होणार आहे. संपूर्ण राज्यभरात कोल्हापुरात हा उपक्रम पहिल्यांदा राबविण्यात येणार आहे असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले आहे.प्रत्येक गावात ही यंत्रणा बसविण्यात येणार असून जिल्हा नियोजन समितीमधून यासाठी निधीची तरतूद होणार आहे. येत्या दोन, तीन वर्षात टप्प्याटप्प्याने प्रत्येक गावात योजनेची अंमलबजावणी होईल. पहिल्या टप्प्यात पूरबाधित गावात ही योजना कार्यान्वित होणार आहे.मोबाइल, इंटरनेट आणि एफएम वाहिनी या यंत्रणेद्वारे कार्यान्वित होणार आहे. ही योजना सोलर पॅनलवर आधारित आहे.त्याला विद्युत पुरवठयाची आवश्यकता नाही. नैसर्गिक आपत्ती, पूर स्थितीबाबत नागरिकांना सतर्क करण्यासाठी ही यंत्रणा प्रभावी ठरणार आहे. याशिवाय सरकारी योजना लोकांपर्यंत पोहचविणे सार्वजनिक घोषणा प्रणालीद्वारे सहजशक्य होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिलदार कार्यालय या ठिकाणी नियंत्रण असणार आहे. कोल्हापूर शहरात सध्या वीस ठिकाणी ही सिस्टिम सुरू आहे. कोरोनाच्या कालावधीत जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी ही योजना राबविली होती.