खासदार संभाजीराजे छत्रपती यांची रांगणा किल्ल्यास भेट
कोल्हापूर/प्रतिनिधी : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज रांगणा किल्ल्यास भेट दिली. यावेळी संभाजीराजे यांनी संपूर्ण दिवसभर रांगणा किल्ल्याची पाहणी केली. यावेळी शाहूपुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी जिर्णोद्धार केलेल्या गडावरील रांगणाई देवीच्या मंदिरासही संभाजीराजेंनी भेट देऊन दर्शन घेतले.
रांगणा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आल्यापासून तो अखेरपर्यंत स्वराज्यात होता. या गडाने जो सुवर्णकाळ अनुभवलेला आहे तो त्याला परत करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. या किल्ल्याच्या संवर्धनासाठी मी स्वतः प्रयत्न करून पाच कोटी रुपये मंजूर करून आणले होते, पण पुरातत्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या गडाचे संवर्धन निकृष्ट पद्धतीचे झालेले आहे, असे आज मला पाहताक्षणी दिसून येत आहे. निसर्गाच्या सौंदर्यांची मुक्त उधळण झालेल्या या किल्ल्याला त्याचे गतवैभव मिळवून देण्यासाठी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या किल्ल्यास स्वतः भेट देणे आवश्यक आहे व त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या गडावर अनेक ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष आहेत. त्यामुळे याठिकाणी उत्खनन होणे गरजेचे आहे. गडावरील अनेक तोफा या खोल दरीमध्ये कोसळल्या आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना पुनर्स्थापित करण्याचे काम पुरातत्व विभागाने करणे अपेक्षित आहे, असे यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले.
तसेच गडाखाली दरीत पडलेल्या तोफा शोधणाऱ्या सर्व दुर्गप्रेमींचे अभिनंदन छत्रपती संभाजीराजे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे फक्त नाव घेऊन राज्य करणाऱ्या लोकांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांची जिवंत स्मारक असणारे गडकिल्ले याचे संवर्धन करणाऱ्या तरुणांचा सहवास मला भावतो असे मत छत्रपती संभाजीराजे यांनी रांगणा किल्ला भेटीदरम्यान व्यक्त केले.
यावेळी संभाजीराजे यांच्यासोबत इतिहास अभ्यासक राम यादव, सचिन भांदिगरे, रविराज कदम, संग्राम पोफळे व परिसरातील शिवभक्त व दुर्गप्रेमी उपस्थित होते.