बसवण्णांचे विचार समजून घेण्याची गरज – राजाभाऊ शिरगुप्पे
कोल्हापूर/प्रतिनिधी : १२ व्या शतकातील क्रांतीकारी समाज सुधारक महात्मा बसवण्णांच्या विचारांची आज समाजाला गरज आहे. आज समाज ज्या वळणावर उभा आहे त्याला तिथून पुढचा प्रवास जर समाधानाने करायचा असेल तर माणसाने माणसाशी माणसासारखे वर्तन केले पाहिजे. यासाठी बसवण्णांचे जीवन कार्य समजून उमजून घेणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक व दिशादर्शक, कार्यकर्ते राजाभाऊ शिरगुप्पे यांनी केले. ते निर्मिती विचारमंच,कार्यालय येथे प्रसिद्ध लेखक विश्वास सुतार लिखित ‘महात्मा बसवण्णा : जीवन व संघर्ष’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभावेळी बोलत होते.
जेष्ठ साहित्यिक आणि संपादक उत्तम कांबळे यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. यावेळी बोलताना राजाभाऊ म्हणाले, बसवण्णांचे चरित्र हे भक्तीप्रधान नसून ते विचार प्रधान आहे. त्यामुळे ते श्रध्दांचा महापूर बाजुला ठेवुन समाजाने समजुन घ्यावे लागेल. आज माणसाचे माणुसपण हरवत असताना बसवण्णांचे हे चरित्र सर्वसामान्यांना उजेडासारखे मार्गदर्शक ठरेल.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. दयानंद ठाणेकर होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून लेखक व कवी मंदार पाटील, लेखिका व प्रकाशिका प्रा. शोभा चाळके, अॅड. अधिक चाळके, विमल पोखर्णीकर, यश तांबोळी, रवि सरदार, संजय नाझरे, रेश्मा गायकवाड, प्रकाशक अनिल म्हमाने यांच्यासह कोल्हापुरातील वाचक व लेखक मंडळी उपस्थित होती.
स्वागत व प्रास्ताविक अनिल म्हमाने यांनी केले तर आभार प्रा. शोभा चाळके यांनी मांडले.