दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा जाहीर पाठिंबा नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांवर दया करून आंदोलन संपवावे केले आवाहन
गडहिंग्लज/प्रतिनिधी : हाडं गोठवणार्या कडाक्याच्या थंडीतही दिल्लीत आंदोलन शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची मागणी मान्य करुन त्यांच्यावर दया करावी आणि आंदोलन संपवावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.गडहिंग्लजमध्ये सलोखा परिषदेच्यावतीने आयोजित सर्वपक्षीय शेतकरी आंदोलनाला मंत्री श्री. मुश्रीफ यांनी भेटून पाठींबा दिला.
मंत्री श्री. मुश्रीफ बोलताना म्हणाले, पिकांना हमीभाव मिळावा ही शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांना करार शेतीची भीती वाटत आहे. त्यामुळेच, शेतकरी काळ्या कायद्याच्या विरोधात गेले महिनाभर थंडी वाऱ्याची तमा न बाळगता दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून आहेत. एका बाजूला बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला हरताळ फासत शेतकरी विरोधी निर्णय घेणारे व आंदोलनाकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसरीकडे मात्र मन की बात मधून मुक्त चिंतन करताना दिसत आहेत. एकदा गुजरातमधून, एकदा आंध्रातून मन की बात मधून बोलणाऱ्या पंतप्रधान मोदीना शेतकऱ्यांशी बोलायला मात्र अपमान वाटत आहे. कुठलाही कायदा तयार करत असताना त्याच्यावर समर्पक चर्चा व्हायला हवी कारण अशा कायद्यामुळे संबंधित घटकावर दूरगामी परिणाम होत असतात.
यावेळी माजी आमदार श्रीपतराव शिंदे, प्रा. किसनराव कुराडे, नगराध्यक्षा सौ. स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष महेश कोरी, बाळेश नाईक, रफिक पटेल, रमजान आत्तार, अरविंद बारदेस्कर, साताप्पा कांबळे, मनोहर दावणे, जे वाय बारदेस्कर, संपत देसाई, दळवी वहिनी, सिद्धार्थ बन्ने, सुरेश ठरकार, महेश सलवादे, गुंडेराव पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट …….
केडीसीसीची बिनव्याजी पिककर्ज योजना मोदींच्या किसान सन्मानपेक्षा चौपट लाभाची….. श्री. मुश्रीफ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या किसान सन्मान योजनेत शेतकऱ्याला महिन्याला पाचशे प्रमाणे वर्षाला सहा हजार रुपये मिळतात. केडीसीसी बँकेकडून तीन लाखापर्यंतचे पिककर्ज बिनव्याजी देणार असून शेतकऱ्यांनी ही रक्कम बँकेत ठेवली तर त्याची व्याजाची रक्कम पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या किसान सन्मान योजनेतील रकमेपेक्षा चौपट होते. एक लाखाला आठ हजार व्याज, दोन लाखाला सोळा हजार व तीन लाखाला २४ हजार असा व्याजाचा चौपट लाभ शेतकऱ्यांना होईल, असेही ते पुढे म्हणाले.