रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड
कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक यांची, तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी आणि सेक्रेटरी पदी बी एस शिंपुकडे यांची निवड झालीय. नूतन पदाधिकार्यांचा पदग्रहण सोहळा, गुरूवारी एका शानदार समारंभात संपन्न झाला. दरम्यान रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं, गरजू महिला, ज्येष्ठ नागरीक, युवती यांच्यासह समाजातील सर्वच घटकांसाठी काम होईल, असे नुतन अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी नमुद केले.
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी, सेक्रेटरी पदी बी एस शिंपुकडे, खजानिसपदी अनिरूध्द तगारे तर जॉईंट सेक्रेटरी पदावर भारती नायक यांची निवड झालीय. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षातील नुतन पदाधिकार्यांचा पदग्रहण सोहळा, गुरूवारी एका शानदार समारंभात पार पडला. इन्स्टॉलिंग ऑफीसर म्हणून, रोटरी पुण्याच्या माजी प्रांतपाल मंजु फडके यांची उपस्थिती होती. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनने सर्वसामान्य आणि वंचित घटकांच्या विकासासाठी काम करावे, असे आवाहन मंजु फडके यांनी केले. देशातील रोटरी क्लबच्या अन्य शाखांपेक्षा, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन उल्लेखनीय काम करेल आणि नावलौकीक प्राप्त करेल, असा विश्वास फडके यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांचीही प्रमुख उपस्थिती होती. सामाजिक क्षेत्रात अधिक जोमाने काम करण्यासाठी, अरूंधती महाडिक यांना रोटरीचे व्यासपीठ मिळाले आहे. त्यातून समाजातील अनेक अडीअडचणी दूर होतील, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. क्लबच्या समाजोपयोगी उपक्रमांना आवश्यक ती शासकीय मदत मिळवून देवू, अशी त्यांनी ग्वाही दिली. तसेच रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनसाठी, खासदार महाडिक यांनी १० हजार अमेरिकन डॉलर मदत निधी जाहीर केला. तर नुतन अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी मनोगत व्यक्त करताना, सर्व सदस्य आणि पदाधिकार्यांना सोबत घेवून, नवनवीन प्रकल्प राबवले जातील. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनचे सुवर्ण महोत्सवी वर्ष संस्मरणीय ठरेल, असे काम करणार असल्याचे सांगितले. दरम्यान सुवर्ण महोत्सवी वर्षातील नवीन कार्यकारिणीची घोषणा सौ. अरूंधती महाडिक यांनी केली. रोटरीच्या उपप्रांतपाल गौरी शिरगावकर, माजी प्रांतपाल संग्राम पाटील, माजी अध्यक्ष शरद पाटील, सेक्रेटरी रितू वायचळ, अरविंद कृष्णन यांनीही यावेळी मनोगते व्यक्त केली. पदग्रहण सोहळ्याला नासिर बोरसदवाला, डॉ. दिपक जोशी, सचिन माने, ऋषिकेश जाधव, सचिन लाड, राहूल पाटील, दिग्वीजय पाटील, योगेश आडसुळे, विकास राऊत, अनिकेत अष्टेकर, पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक, सौ. वैष्णवी महाडिक आणि सौ. मंजिरी महाडिक यांच्यासह भागीरथी संस्था आणि रोटरीचे सदस्य उपस्थित होते.